सातारा : खराब हवमानामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा कोयनानगरचा दौरा रद्द झाला आहे. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोयनानगर भागात आले मात्र पावसाचा जोर वाढला आणि त्यामुळे हेलिकॉप्टर उतरण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुण्याकडे परतावं लागलं. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा, सांगली आणि कोल्हापूरचे हवाई सर्वेक्षण करणार होते. मात्र, कोयनानगर परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं हेलिकॉप्टर साताऱ्यात न उतरता पुण्याला माघारी गेलं आहे. कमी दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टरचं लँण्डिंग होऊ शकलं नाही. 


मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्यानंतर आपत्तीग्रस्त काहीसे नाराज झाले आहेत. हातात निवेदन घेऊन हे आपत्तीग्रस्त तयार होते. मात्र, खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांना दौरा करता न आल्यानं ग्रामस्थ नाराज झालेत. मुख्यमंत्र्यांनी आमची भेट घ्यावी आमच्या व्यथा समजून घ्याव्यात असं या पूरग्रस्त लोकांनी सांगितलंय. मुख्यमंत्र्यांनी आमच्या वेदना त्यांच्या समजून त्यांनी आमची भेट घ्यावी अस या लोकांनी म्हटलंय.


काल मुख्यमंत्र्यानी तळीये, चिपळूणची पाहणी केली. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा जिल्हा दौऱ्यावर जाणार होते. पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी तसंच महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन संवाद साधणार होते. मात्र, कमी दृश्यमानतेमुळे त्यांचा हवाई दौरा रद्द झाला आहे.


दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याला खराब हवामानाचा फटका बसला. अजित पवार कोल्हापूरपासून दौऱ्याला सुरुवात करणार होते. पण खराब हवामानामुळे अजित पवारांनी सांगलीपासून दौऱ्याला सुरूवात केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भिलवडी येथील निवारा केंद्राला भेट दिली.