गायींचा सहवास कोरोनाला रोखतो ? काय आहे व्हायरल मॅसेजमागचं सत्य जाणून घ्या
देशी गायींच्या संपर्कात आल्यामुळे कोरोना होत नाही?
किरण ताजणे, झी २४ तास, पुणे : सोशल मीडियावर सध्या एक मॅसेज चांगलाच व्हायरल होत आहे. देशी गायींच्या संपर्कात असलेल्यांना कोरोनाची लागण होत नाही, असा मेसेज सध्या फॉरवर्ड होतोय... झी २४ तासनं याची सत्यता तपासलीये... त्यात काय आढळून आलंय?
गायींसोबत राहणा-यांमध्ये प्रतिकारशक्ती अधिक?
देशी गायींच्या सातत्यानं संपर्कात असलेल्यांना कोरोना होत नाही, असा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या मेसेजमागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना आम्ही पोहोचलो पुण्यातल्या महानगर गोसेवा समितीच्या कार्यालयात. या समितीनं नुकतंच एक सर्वेक्षण केलंय.
काय आहे गायींमुळे कोरोना रोखण्याचं सत्य ?
राज्यातल्या 300 गोशाळांमधील आकडेवारी संस्थेनं जमा केलीये.
तिथल्या 1 हजार 895 जणांचा या सर्वेक्षणात सहभाग होता.
यापैकी केवळ 14 जणांनाच कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.
विशेष म्हणजे यातले बहुतांश लोक कामानिमित्त नियमितपणे बाहेर जात होते.
गोशाळांच्या आसपास कोरोनाचे रुग्णही आढळले होते.
असं असतानाही देशी गायींच्या संपर्कात आलेल्या 99 पूर्णांक 27 टक्के लोकांना एकदाही कोरोना झाला नसल्याचं अभ्यासात समोर आलंय.
त्यानंतर आम्ही तज्ज्ञांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ प्रमोद मोघे यांच्याशी संपर्क साधला. गोशाळेत काम करणारे लोक गोमुत्र आणि गोमय याच्या सतत संपर्कात येतात. गोमुत्रामध्ये असलेलं व्हालाटाईल ऑर्गेनिक आणि फेनॉलिक कम्पाऊंड असतं. ते अँटीव्हायरल डिसइन्फेक्टंट कम सॅनिटायझरचं काम करत असावं, अशी शक्यता डॉ मोघे यांनी वर्तवलीये.
अर्थात, देशी गायींच्या संपर्कात आल्यामुळे कोरोना होत नाही, याचं कोणतंच शास्त्रीय कारण आमच्या तपासात पुढे आलं नाही. त्यामुळे यावर अधिक संशोधनाची गरज आहे.