मुंबई / नाशिक : राज्यात पुन्हा एकदा थंडीची लाट आलीय. नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये पारा २.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलाय. गेल्या २४ तासांत तब्बल ६ अंशांनी तापमान घसरलंय. गेल्या काही दिवसांपासून राज्यातून थंडी गायब झाली होती. मात्र, आता पुन्हा थंडीचं आगमन झालंय. दरवर्षी संक्रातीनंतर थंडी कमी होण्यास सुरूवात होते. मात्र, ऋतुचक्रच बदलल्यानं यंदा थंडीचा मोसम लांबवण्याची शक्यता आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात २.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. थंड वाऱ्यामुळे गारठा निर्माण झाल्यानं या थंडीपासून उब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. 


मात्र नाशिकरांचा जॉगिंगचा उत्साह कायम आहे. थंडीतही अनेक जण धावण्यासाठी बाहेर पडताहेत. तर दुसरीकडे सकाळीसकाळीच गुलाबी थंडीत गरमागरम मिसळीवर ताव मारायलाही नाशिककरांची गर्दी होताना दिसते आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे पारा घसरला आहे. 



मुंबईतही पारा रात्री १२.३ अंश सेल्सियसपर्यंत खाली आला. हे या मौसमातलं मुंबईतलं सर्वात कमी तापमान नोंदवण्यात आलं. थंडगार वाऱ्यांमुळे तपमानात घट झाली. सकाळपर्यंत मुंबईत गारठा कायम राहणार असल्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं हवामान विभागानं म्हटलंय.