नाशिक : उत्तर भारतातून थंड वाऱ्यांचे प्रवाह येऊ लागल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठला आहे. धुळ्यात पारा पुन्हा २.५ अंशांपर्यंत घसरला आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही पारा कमालीच घसरला आहे. संध्याकाळी सातनंतर घराबाहेर पडणंही अशक्य झालं आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळं गरम कपडेही निरुपयोगी ठरताना दिसत आहेत. तापमान खाली आल्यामुळे लहान मुलांना सर्दी-खोकल्याचा त्रास वाढला असून वृद्धांच्या आरोग्यावरही याचा विपरीत परिणाम दिसून येतोय. विदर्भातही तापमानात घट झाली असून, किमान तापमान सरासरीच्या खाली घसरलं आहे. निफाडमध्येही तापमान ४ अंशांवर आलं आहे. मराठवाड्यात परभणीतही पारा ७.४ अंशांवर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-काश्मीर, हिमाचलप्रदेशात बर्फ दृष्टी होत असल्याने उत्तर भारतासह राज्यातील नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात घट झाली आहे. निफाड इथल्या कृषी संशोधन केंद्र, कुंदेवाडीत हवामान केंद्रावर ४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. निफाड तालुका गारठल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिक उब मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. या कडाक्याच्या थंडीचा मानवी जीवनाबरोबर शेती पिकांवरही चांगला वाईट परिणाम होताना दिसत आहे. वाढत्या थंडीमुळे गहू, हरभरा या पिकांना फायदेशीर ठरत आहेत या कडाक्याच्या थंडीने द्राक्षबागांवर भुरी, डाऊनी या रोगांचा प्रदुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. याशिवाय पक्क होत असलेल्या बागांचे मनी तडकण्याचेही प्रमाण वाढण्याची स्थिती निर्माण झाल्याने द्राक्ष उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.


याआधीच उत्तर मध्य महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, अहमदनगरमध्ये काही ठिकाणी शीत लहरीची शक्यता वर्तवण्यात आली होती. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात तुरळक पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली होती. मागील आठवड्यापासून राज्यात सवर्त्र थंडीची लाट आहे. थंडीचा हा जोर आणखी काही दिवस असाच राहणार आहे. २ दिवसांपासून राज्यात तापमानात घट पाहायला मिळत आहे.


हिमालयात तसेच आजुबाजुच्या राज्यात बर्फवृष्टीमुळे शीत लहरी वाहत आहेत. कोरडं हवामान असल्यामुळे राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश सर्वच ठिकाणी थंडीची हुडहुडी वाढली आहे. नाशिक, नागपूर, पुणे या ठिकाणी ही थंडीचं प्रमाण वाढलं आहे.