नाशिक : राज्यत थंडीचा जोर पुन्हा वाढाला आहे. तापमानाचा पारा चांगलाच खाली उतरला आहे. निफाडमध्ये ६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात ६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे २४ तासांतच निफाडचा पारा तब्बल ५ अंशाने खाली आला आहे. येत्या २४ तास मध्य महाराष्ट्र गारठलेलाच राहिलं अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाडचा पारा घसरला आहे. उत्तरेकडून वाहणारे वारे हे थंड आणि शुष्क असून हवेतील आद्रता ५० टक्के कमी असल्यामुळे सध्या थंडावा जाणवत असल्याचंही हवामान विभागाने सांगितलं. थंड वाऱ्यामुळे गारठा निर्माण झाल्याने या थंडीपासून उब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहे.


मुंबईतही थंडीचा जोर वाढला असून हवेत थंडावा आहे. आगामी तीन दिवस मुंबईतील हवेत असाच थंडावा जाणवण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे. आगामी दोन दिवसात मुंबईतील हवामान १६ ते १८ अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.