मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकरांना थंडी जाणवू लागली पण आज या थंडीने आपली सीमा ओलांडलेली पाहायला मिळत आहे. मुंबई शहरात कमाल तापमानाचा पारा २४ अंश सेल्सियसपर्यंत खाली असल्यानं मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी भरलीय. त्यामुळे मुंबईकरांवर आता स्वेटर घालून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. तर महाबळेश्वरमध्ये पारा शून्य अंशावर आलाय. त्यामुळे थंडीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक महाबळेश्वरच्या दिशेने जात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अचानक वाढलेल्या थंडीमुळे मुंबईकर चांगलेच गारठले आहेत. मुंबईत सरासरीपेक्षा कमाल तापमानात जवळपास सहा अंश सेल्सिअसनं घट झाली आहे. गेल्या दहा वर्षांत फेब्रुवारी महिन्यात प्रथमच तापमानाचा पारा इतका खाली गेला आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे तापमानात घट झाल्याचे हवामान खात्यानं सांगितले आहे. पुढील दोन दिवस कमाल तापमानासह किमान तापमानामध्ये घट होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. 



महाबळेश्वरचा पारा शून्य अंशांवर आला आहे. वेण्णालेक आणि लिंगमळा परिसरात स्ट्रॉबेरी पिकावर बर्फ जमा झाला आहे. पाण्याचाही बर्फ झालेला पहायला मिळत आहे. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये काश्मीरचे वातावरण तयार झालेले पाहायला मिळत आहे.