पुणे : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणुक भाजपने प्रतिष्ठेची केलीय. या निवडणुकीत भाजप विरोधात सर्व पक्ष असा सामना रंगणार आहे. शिवाय चंद्रकांत पाटील यांच्या होमपीचवर ही निवडणूक होत असल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूरच्या निवडणुकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महिनाभर येथे तळ ठोकून आहेत. आज पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. 'देशाचे महान नेते आणि सतत पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणारे शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर माझ्या मनात काही प्रश्न पडले.


तपास यंत्रणांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची चौकशी झाली. त्यावेळी पवार यांना कधी मोदींची भेट घ्यावी वाटली नाही. मात्र, संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली म्हटल्यावर ते मोदींच्या भेटीला गेले. यावरून राऊत हे पवारांचे आहेत हे मी म्हणत होतो ते सिद्ध झालं, असं पाटील म्हणाले.


शरद पवार यांच्या डोक्यात काय चालू आहे हे त्यांच्या पत्नीला देखील कळत नसेल. वेळ आल्याशिवाय शरद पवार साहेब स्वतःच्या मनाशी देखील बोलत नाहीत. कार्यकर्त्यांना बरं वाटावं म्हणून मी काहीही बोलत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. याचवेळी कोल्हापूर उत्तर निवडणुकीत आम्ही 100 टक्के विजयी होणार, असा दावाही त्यांनी केला.


चंद्रकांत पाटील एकीकडे कोल्हापूरच्या निवडणुकीत व्यस्त असताना दुसरीकडे मात्र याच दादांना परत येण्याचं आवाहन पुणेकरांनी केलंय. विधानसभा निवडणुकीत सुरक्षित मतदारसंघ म्हणून कोल्हापूरच्या 'दादां'नी पुण्यातील कोथरूड मतदारसंघ निवडला. येथील तत्कालीन आमदार मेघा कुलकर्णी  यांना ही जागा पाटील यांच्यासाठी सोडावी लागली.


मात्र, निवडून आल्यापासून 'दादा' जास्त वेळ कोल्हापूरलाच देत असल्याने मतदारसंघात नाराजी वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात आता थेट बॅनर्स लावण्यात आलेत. एका बॅनरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांचा फोटो लावून 'हरवले आहेत' असं म्हटलंय. 'पुणे शहरातील कोथरुड मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील हे गेल्या महिन्याभरापासून हरवले आहेत. कोणाला सापडल्यास कृपया संपर्क साधावा. समस्त कोथरुडकर," असं या बॅनरवर लिहिण्यात आलंय.



तर, कोथरुडमध्येच आणखी एक बॅनर लागला असून त्यात, ''दादा परत या' असं म्हटलंय. "दादा, एक महिना झाला तुमचा शोध कुठेच लागत नाही, आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या, आम्ही तुमची वाट पाहतोय. समस्त कोथरुडकर.'असं लिहून दादांची फिरकी घेण्यात आलीय.


हे बॅनर नेमके कोणी लावले असतील याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, हे बॅनर्स पाहून तरी आमदार दादा परत येतील का? अशी शंका येथील नागरिक घेत आहेत.