अपंगत्वावर मात करत झाडावर चढतो `हा` अवलिया
त्याच्या जिद्दीला सलाम
प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : झाडावर सरसर चढणं कदाचित सरावानं कुणालाही जमू शकेल..पण रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात एक अवलिया आहे जो एक पाय नसताना, कोणत्याही झाडावर क्षणार्धात चढू आणि उतरूही शकतो....
एक पाय नसलेल्या या अवलियाचं नाव आहे श्रीपत जवरत. संगमेश्वर तालुक्यातील तुरळ हरेकर वाडीत ते राहतात. अपघातानं त्यांना हे कायमचं अपंगत्व आलं. वयाच्या १३ व्या वर्षी विजेच्या खांबावर चढत असताना विजेचा शॉक लागल्यानं त्यांना उजवा पाय कायमचा गमवावा लागला. मात्र अपंगत्वाचं भांडवल न करता, ते जिद्दीनं एका पायावर उभे राहिले. माड असो नाहीतर कोणतंही उंच झाड, त्यावर सरसर चढणं आणि झाडाची साफसफाई करणं हा त्यांचा उदरनिर्वाहाचा उद्योग बनला. दोन हात आणि एका पायाच्या सहाय्यानं झाडावर चढण्या-उतरण्याचं त्यांचं कौशल्य भल्याभल्यांना अचंबित करतं.
'एक माड साफ करण्याचे 200 रूपये मिळतात. दिवासातून कधी दहा तर कधी पंधरा एक माड मी साफ करतो. खूप लांबून लांबून मला झाडावर चढण्यासाठी घेवून जातात पंचक्रोशीत तर माझ्याशिवाय दुसरं कोणालाही बोलवत नाहीत,' अशी भावना श्रीपत जवरत व्यक्त करतात.
कायमस्वरूपी अपंगत्व आल्यानं श्रीपत जवरत यांना लग्नासाठी कुणी मुलगीही दिली नाही. पण त्याचा अजिबातच बाऊ न करता, कष्ट करून ते स्वतःचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांना काम देण्यासाठी लांबून लांबून लोक घरी येतात.
'अपंग असल्याने कोणीही मुलगी द्यायला तयार नव्हते त्यामुळे तसेच तो स्वत:ची कामे स्वत: करतात गेली 40 वर्ष हा नित्यनियमाने झा़डावर चढणे आणि हा त्यांचा आता हातचा खेळ झाला आहे,' ही खंत श्रीपत यांचे भाऊ विठ्ठल जवरत व्यक्त करतात.
'श्रीपत जवरत यांना आम्ही कामाला बोलावतो याला कारण म्हणजे त्यांच्यात असेली जिद्द त्यांनी अशक्याप्राय गोष्ट त्यांच्या कृतीतून शक्य करून दाखवली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना कामावर बोलावतो आणि ते देखील कोणतंही काम करण्यासाठी तत्पर असतात. विशेष म्हणजे इतर अपंगाप्रमाणे ते खचले नाहीत किंवा भिक मागण्याचं काम देखील त्यांनी केलं नाही त्यामुळे त्यांच्या याच कृतीमुळे आम्ही त्यांना बोलावतो,' असे संजय ओकटे सांगतात.
४० वर्षांच्या जवरत यांनी आतापर्यंत स्वतःच्या मेहनतीनं एका पायावर जिद्दीनं कमाई केली. पण वाढत्या वयामुळं भविष्यात हे काम किती झेपेल, याबाबत शंका आहे. त्यामुळं सरकारकडून पेन्शन मिळावी, एवढी त्यांची माफक अपेक्षा आहे.