मुख्यमंत्र्यांसह 6 मंत्र्यांवर मराठा समाजाची फसवणूक केल्याची तक्रार
मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप
पुणे : आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने राज्यभरात मुक मोर्चा काढला. मुंबईत याचं विराट रुप पाहायला मिळालं होतं. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकारने काही आश्वासन दिल्यानंतर मराठा समाजाचा हा मोर्चा संपवण्यात आला होता. राज्यात पाच कोटी मराठा लोकसंख्या आहे. यावेळी राजकीय वातावरण ही चांगलंच तापलं होतं. अनेक पक्षाने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता. अनेक नेते या मोर्चात सहभागी झाले होते.
दुसरीकडे मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागालेल्या घटकांचा विकास व्हावा आणि युवकांनी उद्योगाकडे वळावे यासाठी सरकारने आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज व्याज परतावा योजना लागू केली होती. परंतू, त्या योजनेतंर्गत कर्ज वाटपाचा कोणताही आदेश महाराष्ट्र सरकारने बॅंका किंवा महामंडळाला दिलेला नाही. केवळ अध्यादेश काढून समस्त मराठा समाजाची शासनाने फसवणूक केल्याचा आरोप यावेळी तक्रारकर्त्याने केला आहे.
आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून खोटे आश्वासन देत मराठ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यासह सहा मंत्र्यांविरुद्ध योगेश पवार यांनी तक्रार दाखल केली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांची दखल घेत राज्य सरकारने दिलेली आश्वासने न पाळल्य़ाची तक्रार देखील छावा संघटनेचे कार्यकर्ते योगेश पवार यांनी फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.
मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांविरोधात मराठा समाजाची फसवणूक केल्याची ऑनलाईन तक्रार योगेश नागनाथ पवार यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात केली आहे. यासाठी 32 पानांची तक्रार आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची सिडी तक्रारकर्त्याने जोडल्या आहेत.