बेळगाव : ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेले कॉम्रेड अण्णा भाऊ साठे 8 वे साहित्य संमेलन यंदा प्रथमच सीमावर्ती भागातील बेळगाव येथे होत आहे. 16 व 17 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व विचारवंत डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार असून, हैदराबाद येथील इंग्रजी व विदेशी भाषा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू प्रा. डॉ. माया पंडित यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसाहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर विविधांगी चर्चा व्हावी. तसेच, त्यांच्या साहित्याचे समकालीन महत्त्व जाणून घेण्याच्या उद्देशाने कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 2008 साली कोल्हापूर येथे पहिले राज्यव्यापी कॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन आयोजित केले होते. पुढे हेच संमेलन महाराष्ट्रात अहदमनगर, नांदेड, नागपूर, नाशिक, सावंतवाडी व बार्शी येथे संमेलन येथे पार पडले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कॉ. अण्णा भाऊंचा महत्तत्वपूर्ण सहभाग असल्याने त्यांच्या नावाने सुरू झालेले हे संमेलन सीमावर्ती भागातही आयोजित केले जावे, असा मनोदय कॉ. पानसरे यांनी यापूर्वीच व्यक्त केला होता. त्याला अनुसरून यंदाचे आठवे साहित्य संमेलन बेळगाव येथे होत आहे.


बेळगाव येथील कॉ. कृष्णा मेणसे पुरोगामी व्यासपीठाच्या वतीने मराठा मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय संमेलनात चार परिसंवाद होणार असून, एक विशेष व्याख्यान होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक व भाषातज्ज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी (गुजरात), सुप्रसिद्ध हिंदी कवी डॉ. अरूण कमल (पाटणा), विशेष पोलिस महानिरीक्षक व लेखक उद्धव कांबळे, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी सतीश काळसेकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, लेखिका कॉ. मुक्ता मनोहर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस व लेखक डॉ. भालचंद्र कानगो यांच्यासह मान्यवर लेखक व कवी सहभागी होणार आहेत.


संमेलनाच्या एका सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून, पहिल्या दिवशी होणार्‍या शाहिरी जलशात कोल्हापूरचे शाहिर सदाशिव निकम,सातारच्या शाहिर शीतल साठे शाहीरी गीते सादर करणार आहेत. तसेच स्थानिक कलावंताना प्रोत्साहन देण्यासाठीही विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. उद्घाटनाच्या सत्रात बेळगावातील मान्यवर शाहिरांचा सत्कारही करण्यात येणार आहे.


या साहित्य संमेलनात साहित्यिक, प्राध्यापक आणि विद्यार्थी-युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजन समितीच्या स्वागताध्यक्षा डॉ. संध्या देशपांडे,कार्याध्यक्ष नागेश सातेरी, उपाध्यक्ष दिपक दळवी, कार्यवाह प्रा. डॉ. आनंद मेणसे, अनंत जाधव यांनी केले आहे.