महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये शिवसैनिक आणि विदर्भवादी भिडले
विदर्भ विषयावरच्या चर्चासत्रात, शिवसैनिक आणि विदर्भवादी एकमेकांना भिडले.
नागपूर : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये संध्याकाळी प्रेस क्लबतर्फे आयोजित विदर्भ विषयावरच्या चर्चासत्रात, शिवसैनिक आणि विदर्भवादी एकमेकांना भिडले. यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत, शिवसैनिकांनी सभागृह डोक्यावर घेतलं. तर विदर्भवाद्यांनी जय विदर्भच्या घोषणा देत शिवसैनिकांवर शाब्दिक हल्ला चढवला़. घोषणा, नारेबाजीपासून सुरु झालेला हा वाद हातघाईवर आला़. विदर्भाबाबतचा प्रश्न श्रीहरी अणे यांना विचारण्यात आला़ असता, त्यांनी विदर्भाच्या मागणीला जनसमर्थन असल्याचा दावा केला़. तेव्हा शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांचे विचार ऐकायला आलेल्या शिवसैनिक आणि महाराष्ट्रवाद्यांनीही अखंड महाराष्ट्राचा विजय असो, अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडलं. त्यानंतर शिवसैनिक आणि विदर्भवादी कार्यकर्त्यांत चांगलीच बाचाबाची झाली़.
अडसूळांचा इशारा
आयोजकांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला़, पण कुणीही ऐकायला तयार नव्हतं. महाराष्ट्रदिनी विदर्भवादी काळे झेंडे दाखवणार आहेत, याबद्दल अडसूळांना विचारलं असता, महाराष्ट्रात राहून अशी कृतघ्नता करणं योग्य नाही़. शिवसेना गप्प बसणार नाही़ असा इशारा आनंदराव अडसूळांनी दिला.