मुंबई : राज्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असला तरी त्यात अनंत अडचणी आहेत. पोर्टल नीट काम करत नसल्यानं लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी पाहायला मिळतेय. त्यामुळे आजारापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती होणार नाही ना, याची भीती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविन पोर्टलबाबत नागरिकांना अनेक समस्या


देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला आहे. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींना आता कोविडची लस घेता येणार आहे. मात्र अन्य कोणत्याही सरकारी कामाप्रमाणे इथंही गोंधळाची स्थिती पाहायला मिळतेय... लसीकरणासाठी वेळ घेण्याकरिता कोविन या पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिक टेक्नोसॅव्ही नाहीत. त्यामुळे यात अनेक अचडणी येत असल्याची तक्रार आहे.


लसीकरण केंद्रांबाहेर नागरिकांची प्रचंड गर्दी 


अनेकदा इंटरनेटचा स्पीड किंवा पोर्टलमधील गोंधळामुळे साईट खूप स्लो होत असल्याचं दिसतंय. त्यामुळे अनेक जण वॉक इनचा पर्याय निवडतायत आणि लसीकरण केंद्रांवर अशी गर्दी करत आहेत. राज्याच्या बहुतांश शहरांमध्ये असंच चित्र आहे. पोर्टलवर समस्या असल्यामुळे अनेक जण अपॉइंटमेंट न घेता लसीकरण केंद्रांवर गर्दी करताना दिसतायत. या समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. 


पोर्टलला समस्या येत असल्यानं ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाणं, हाच पर्याय सोपा वाटतोय. मात्र त्यामुळे वाढत्या उन्हात तासनतास रांगेत उभं राहण्याची शिक्षा त्यांना भोगावी लागतेय. अनेकदा सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाल्याचं दिसतंय. त्यामुळे लस घेऊन कोरोनापासून वाचण्यापेक्षा  ही गर्दीच कोरोनाला निमंत्रण देणारी तर ठरणार नाही ना, अशी भीती व्यक्त होते आहे.