Kirit Somaiya | सोमय्यांना आधी धक्काबुक्की, नंतर सत्कार, आता शुद्धीकरण, पुढे....
किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या सत्काराच्या 2 तासांनंतर काँग्रेस (Congress) आणि आम आदम पार्टीने (AAP) त्या पायऱ्यांचं शुद्धीकरण केलं आहे.
पुणे : भाजपचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या यांचा आज पदाधिकारी आणि नगरसेवकांकडून महापालिकेतील पायऱ्यांवर सत्कार करण्यात आला. हा सत्कार त्याच पायऱ्यांवर करण्यात आला ज्या पायऱ्यांवर त्यांना शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली होती. आता सत्काराच्या 2 तासांनी काँग्रेस आणि आम आदम पार्टीने त्या पायऱ्यांचं शुद्धीकरण केलं आहे. या प्रकारामुळे आता पुन्हा या वादाचा नवा अंक पाहायला मिळणार का, याकडे सर्वांच लक्ष असणार आहे. (congress and aap purification to pune corporation office steps after Kirit Somaiya honor)
काँग्रेस आणि आपच्या कार्यकर्त्यांनी या पायऱ्यांवर गोमुत्र आणि गुलाब पाणी टाकून शुद्धीकरण केलं आहे. संजय राऊतांनी कोरोना रुग्णालयाच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. त्यानुसार सोमय्या पुणे महापालिकेत निवेदन देण्यासाठी गेले होते.
यावेळेस त्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. त्याच जागी म्हणजेच पायऱ्यांवर सोमय्यांचा भाजपकडून सत्कार करण्यात आला. मात्र अवघ्या 2 तासांनी काँग्रेस आणि आपच्या कार्यकर्त्यांनी त्या पायऱ्यांच गोमुत्र आणि गुलाब पाणी टाकून ती जागा शुद्ध करुन घेतली. त्यामुळे आता भाजप या प्रकरणावर काय उत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
दरम्यान याआधी अशाच प्रकारचं शुद्धीकरण हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आलं होतं. तेव्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं होतं.
नारायण राणे यांची 'मोदी सरकार 2' मध्ये केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली होती. राणे यांच्याकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग विभागाची जबाबदारी सोपावण्यात आली होती. या नंतर राणेंनी शिवाजी पार्कात जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. मात्र यानंतर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं होतं.