... म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध
Narendra Modi`s visit to Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे शहरात येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून विरोध करण्यात येत आहे.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे शहरात येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून विरोध करण्यात येत आहे. दोन्ही काँग्रेसकडून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करून विरोध दर्शवला जाणार आहे. (Congress and NCP oppose Prime Minister Narendra Modi's visit to Pune)
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंतप्रधान ज्या मार्गावरून प्रवास करणार आहेत ते मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. संपूर्ण रस्त्यावर बांबूचे कुंपण घालण्यात आले आहे.
पुण्यातील मेट्रोच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील साधारणपणे एक तृतीयांश काम पूर्ण झाले. संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वाला येण्यास अवकाश आहे. असे असले तरी हा प्रकल्प पुणेकरांच्या दृष्टिकोनातून मोठा दिलासा ठरणार आहे.
म्हणून मोदी यांच्या दौऱ्याला विरोध
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचा दौरा केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आखण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. मेट्रो प्रकल्पाचे काम अपूर्ण असतानाही त्याच उद्घाटन होत आहे. त्याशिवाय केंद्रातील भाजप सरकार तसेच भाजपच्या नेत्यांकडून महाराष्ट्राचा अनेकदा अवमान करण्यात आला. त्याचप्रमाणे राज्यपाल तसेच अनेक नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात आला. या सगळ्याचा निषेध म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून पुण्यात निदर्शने करण्यात येणार आहेत.
काँग्रेस पक्षातर्फे अलका टॉकीज चौकात तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर निदर्शने करण्यात येणार आहेत.