मुंबई: राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर रिक्त झालेल्या काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागली आहे. काँग्रेस पक्षाकडून शुक्रवारी सकाळी ही घोषणा करण्यात आली. बाळासाहेब थोरात हे राधाकृष्ण विखे-पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जातात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीपूर्वी राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळीच बाळासाहेब थोरात यांनी विखेंना नैतिकतेची आठवण करून दिली होती. तसेच राधाकृष्ण विखे हे काँग्रेसशी निष्ठावान आहेत का हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे, असा टोलाही लगावला होता. 


दरम्यान, काँग्रेसकडून विधिमंडळ पक्षनेतेपदासह अन्य पदांसाठीची नावेही जाहीर करण्यात आली. यामध्ये विधानसभेच्या नेतेपदी विजय वडेट्टीवार आणि उपनेतेपदी नसीम खान यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. तर बसवराज मुरुमकर यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती झाली आहे. याशिवाय, के. सी. पाडवी, सुनील केदार, जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे यांच्याकडेही विधानसभेच्या प्रतोदपदाची धुरा सोपवण्यात आलेय. तर विधानपरिषदेच्या गटनेतेपदी  शरद रणपिसे आणि उपनेतेपदी रामहरी रुपनवार यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय, भाई जगताप हे विधानपरिषदेतील काँग्रेसचे प्रतोद असतील.