कोल्हापूर: राज्यातील आगामी विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचा असेल, असे वक्तव्य करून विरोधकांना डिवचणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पलटवार केला आहे. ते शनिवारी कोल्हापुरातील पत्रकारपरिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरशासमोर उभे राहावे, त्यांना पुढील विरोधी पक्षनेता दिसेल, असे त्यांनी म्हटले. तसेच आगामी निवडणुकीत मित्रपक्षांनाच घेऊन लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, वंचित बहुजन आघाडीबरोबर अजूनही चर्चा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमधील पत्रकारपरिषदेत विरोधकांना टोला लगावला होता.  आमची लढाई ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी नाही. आमची लढत वंचितसोबतच आहे. वंचित बहुजन आघाडीचा येत्या काळात विरोधीपक्ष नेता होईल. वंचितला भाजपाची 'बी टीम' म्हणणारे काँग्रेस राष्ट्रवादीच आता 'बी टीम' होत आहे. त्याची काळजी त्यांच्या नेत्यांनी करावी, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला होता. 



यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही फडणवीस यांना टोला लगावला. मुख्यमंत्र्यांनी आता ज्योतिषाचे काम करावे, असे त्यांनी म्हटले. जे विरोधक भाजपमध्ये येणार नाहीत, त्यांच्याविरोधात चौकशी संस्थांकडून चौकशीचा समेमिरा लावला जातो. आमच्या पक्षात या अन्यथा तुमच्या चौकशी लावू, असे धमकावले जाते. या धमक्या केवळ 'राष्ट्रवादी'च्याच नेत्यांना नसून, काँग्रेसच्या नेत्यांनाही देण्यात येत आल्याचाही आरोप त्यांनी केला.