शरद पवार यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे महाविकास आघाडीचे अस्तित्व; अशोक चव्हाण यांचे वक्तव्य
शरद पवार वेगळी भूमिका घेत नाहीत तोपर्यंत मविआला काही धोका नाही असं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी झी 24 तासच्या ब्लॅक अँड व्हाईट कार्यक्रमात स्पष्ट केले.
Congress Leader Ashok Chavan Exclusive Interview : महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप आला आहे. शिवसेनेपाठोपाठ शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष देखील फुटला आहे. अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्री झाले आहेत. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह माझ्याकडेच आहे. पक्ष म्हणूनच सत्तेत सहभागी झालो. शपथविधीनंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीवर दावा केला आहे. या राजकीय भूकंपाचा हादरा महाविकास आघाडीला बसला आहे. अजित पवार यांचा मोठा गट फुटल्याने महाविकास आघाडीच्या वज्रमुठीला तडे गेले आहेत. शरद पवार यांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीचे अस्तित्व ठरणार आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी हे वक्तव्य केले आहे. 'झी 24 तास'च्या 'Black and White' या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांनी अशोक चव्हाण यांची मुलाखत घेतली. यावेळी अशोक चव्हाण सध्याच्या राजकीय घडामोडीवर भाष्य केले.
शरद पवार यांनी राजीनामा दिला तेव्हाच शंका आली होती
शरद पवार यांनी राजीनामा दिला तेव्हाच काही तरी मोठी राजकीय घडामोड घडणार अशी शंका आली होती. एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना कंटाळून राजीनामा देत असल्याचे सांगत भाजपला पाठिंबा दिला हे ऑन रेकॉर्ड आहे. अजित पवार यांना टार्गेट करणारे आता त्यांच्यासह सत्तेत मांडीला मांडी लावून बसणार आहेत. निवडणुका झाल्यानंतर निकाल आल्यानंतर महाविकासआघाडीचे सरकार सतत्ते आले. आम्ही कुणाला फोडून अथवा कोणता पक्ष फोडून सत्ता स्थापन केली नव्हती. एकनाथ शिंदे यांनी बंडोखोरी केली. अजित पवारांनी देखील आमदारांना सोबत घेऊन सत्तेत सहभागी झाले. यात काँग्रेस पक्षाने अशी कोणत्याही प्रकारची कृती केलेली नाही. यामुळे काँग्रेस पक्षाने आपली विश्वासहर्ता टिकवून ठेवली आहे. आमदारांची पळपळवी आणि पक्ष फोडण्याचे राजकारण आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात पहायला मिळाले नाही.
महाविकास आघाडीचे काय होणार?
महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यावर महाविकास आघाडीची वाटचाल निश्चित होईल. यामुळे शरद पवार यांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीचे अस्तित्व अवलंबून आहे. राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची एकजूट कायम राहण्यास काही हरकत नाही असेही असोक चव्हाण म्हणाले.