मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजपच्या युतीने लढली. पण निकालानंतर सर्व गणित बदललं. सत्ता आणि पदांचं समान वाटप या कारणावरून दोघांमध्ये फूट पडली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी बनली आणि बहुमताने आज सत्तेतही आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. हा सर्व प्रकार घडत असताना मुंबईबाहेर असलेले काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवतीर्थावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा हे अनुपस्थित होते. त्यामुळे ते महाविकास आघाडीच्या काँग्रेसने घेतलेल्या निर्णयावर नाराज असल्याची चर्चा माध्यमांतून होऊ लागली होती. या चर्चेला मिलिंद देवरा यांनी पूर्णविराम दिला आहे. 



लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवाची जबाबदारी स्वीकारत मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबई काँग्रेसचे अंतर्गत वाद उफाळून आले होते. निरुपम-देवरा वाद वाढल्याचे पाहायला मिळाले. आता राज्यातील राजकारणाचे महानाट्य संपून चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान मिलिंद देवरा यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी आघाडी विरोधी आहे हे वाचून आश्चर्य वाटल्याचे देवरा यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्ता स्थापन करावी आणि शिवसेनेचा बाहेरुन पाठींबा घ्यावा असे मत देवरा यांचे होते. या मतावर काँग्रेसच्या एका गटात मतमतांतरे पहायला मिळाली.



आघाडीचा निर्णय पक्षाने विचारपूर्वक आणि सर्वांना एकत्र घेऊन घेतला आहे. समान किमान कार्यक्रमाची मी सहमत असल्याचे सांगत मुंबईच्या विकासासाठी आघाडी सरकार सक्षम असल्याचा विश्वास देवरा यांनी व्यक्त केला आहे.


सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये जे महाराष्ट्रसाठी योग्य आहे ते मी मान्य करतो. काही व्यक्तिगत कारणामुळे मी मुंबईच्या बाहेर असल्याने मी शपथविधी कार्यक्रमासाठी उपस्थित नव्हतो. पक्षाचा निर्णय तोच माझा निर्णय असल्याचे देवरा यांनी स्पष्ट केले आहे.