ब्युरो रिपोर्ट, झी २४ तास, मुंबई : शिवसेनेला २०१४ मध्येच काँग्रेसबरोबर सरकार स्थापन करण्याची इच्छा होती. पण तेव्हा काही जमलं नाही. हा एवढा मोठा आणि महत्त्वाचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. पृथ्वीराज चव्हाण हे आताच का बोलले असावे ? २०१४ मध्ये शिवसेनेला खरंच काँग्रेसबरोबर स्थापायची होती सत्ता ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४ मध्ये चारही पक्ष स्वबळावर लढले होते. महाविकासआघाडी सरकार त्या हीवेळी होणं शक्य होतं पण निकाल लागताच भाजपला बाहेरुन पाठिंबा देण्याची भूमिका राष्ट्रवादीनं घेतली आणि २०१४ ची मोदी लाट पाहता, शिवसेनेनं फार काही हालचाल केली नसावी असा निष्कर्ष काढला जात आहे.पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे मातब्बर आणि संयमी नेते तसंच हायकमांडच्या जवळचे समजले जातात. पाच वर्षांपूर्वी जे घडलं, त्याचा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाणांनी आताच का केला असावा ? असा प्रश्न उपस्थित होतोय. 


गेल्या काही काळात सावरकर, इंदिरा गांधी आणि इतर मुद्द्यांवरुन शिवसेनेकडून काँग्रेसला लक्ष्य केलं जातंय. कुठलीही किंमत चुकवावी लागली तरी चालेल असा इशारा अशोक चव्हाणांनी दिलाय. तर काहीही ऐकून घ्यायला आम्ही भाजप नाही, असं आणि नितीन राऊत यांनीही शिवसेनेला सुनावलंय. पृथ्वीराज चव्हाणांचा हा गौप्यस्फोट म्हणजे शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी एक पाऊल पुढे आहे की राज्याच्या राजकारणात स्वतःचं उपद्रव मूल्य वाढवण्याचा प्रयत्न आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. 



शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तीन अत्यंत भिन्न विचारधारा असलेले पक्ष एकत्र सत्तेवर आले आणि महाराष्ट्रासह देशानं एक चमत्कारच पाहिला. पण हा चमत्कार २०१४ मध्येच दाखवण्याची शिवसेनेची इच्छा होती असा  गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाच वर्षांनंतर केला. 


२०१४ मध्ये शिवसेनेने सत्ता स्थापण्याचा प्रस्ताव दिला होता. भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेनेननं प्रस्ताव दिला होता पण हा प्रस्ताव काँग्रेसनं तात्काळ धुडकावला. पराभूत झाल्यानं विरोधात बसणार हे आम्ही आधीच स्पष्ट केलं होतं. आताही सेनेसोबत जाण्यास सोनिया गांधी उत्सुक नव्हत्या. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर त्यांनी अनुकूल भूमिका घेतली.
 
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ४० आमदारांना धमक्या, आमिष दाखवलं गेलं. भाजप-सेनेतला वाद पाहता आम्ही भूमिका बदलण्याचं ठरवल्याचे चव्हाण यांनी सांगितले. पर्यायी सरकारबाबत विचार सुरू केला आणि त्यात पुढाकार घेतला.


पृथ्वीराज चव्हाणांच्या या गौप्यस्फोटानंतर शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाल्याचं म्हणत भाजपनं हल्लाबोल केलाय. शिवसेना आणि राष्ट्रवादीनं मात्र अशा या प्रस्तावाबद्दल काहीच माहीत नसल्याचं म्हटलंय.