पुणे : काँग्रेसचे नेते (Congress leader ) आणि राज्यसभेचे सदस्य राजीव सातव ( Rajiv Satav) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना येथील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांना जास्त त्रास होऊ लागल्याने ते व्हेंटिलेटरवर आहेत. परंतु त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांकडून आणि नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांनी त्यांच्या तब्बेतीची फोनवरु चौकशी केली. (Congress leader Rajiv Satav on ventilator but in stable condition)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजीव सातव यांना कोरोनाची लागण झालेली असून जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. हळूहळू सुधारणा होईल, अशी अपेक्षा  डॉकटांनी व्यक्त केली आहे. त्याआधी मुंबईत माहिती देताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, राजीव सातव यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना पुण्यात जहांगीरमध्ये दाखल करण्यात आले आहे. 


22 एप्रिल रोजी राजीव सातव यांनी ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती.  सौम्य लक्षणे जाणवल्यानंतर चाचणी केली असता आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियमांचं पालन करावे, असं आवाहन त्यांनी ट्विटवरुन केले होते.त्यानंतर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले होते. 


दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असली तरी मुंबईमधील लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमला बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फोन करुन राजीव सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, राजीव सातव यांना भेटण्यासाठी किंवा रुग्णालयात कोणीही येऊन गर्दी करु नये, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.