Varsha Gaikwad Letter to CM Eknath Shinde : सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, निवृत्तीवेतन मिळावं आणि वेतनात वाढ व्हावी या मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका या आंदोलन करत आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यभरातील अंगणवाडी सेविका त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलनासाठी बसल्या आहेत. आता याच अंगणवाडी सेविकांना काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचे अनेक प्रश्न सध्या प्रलंबित आहेत. त्याबद्दल सध्याच्या सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गरज आहे. अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, निवृत्तीवेतन मिळावं आणि वेतनात वाढ व्हावी, या प्रमुख मागण्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. 


वर्षा गायकवाड यांच्या पत्रात काय?


यात त्या म्हणाल्या, दुर्गम भागात शिक्षण, आरोग्य, लसीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये या अंगणवाडी सेविकांचं योगदान खूप मोलाचं आहे. या अंगणवाडी सेविका वेतनवाढीच्या आणि निवृत्तीवेतनाच्या मागणीसाठी ४ नोव्हेंबरपासून राज्यभर आंदोलन करत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांबाबत आपण तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावून तोडगा काढावा. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचे रोखून ठेवलेले पगारही त्यांना तातडीने द्यावेत, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे. 


त्यासोबतच गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकांचे पगारही शासनाने अडवून ठेवले आहेत. याबाबत तातडीने निर्णय घेऊन ग्रामीण आणि दुर्गम भागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांसाठी सरकारने त्वरित योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे, अशीही मागणी पत्राद्वारे गायकवाड यांनी केली. 


"मी अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी"


"मी अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी भविष्यकाळात खंबीरपणे उभी असेन. तसेच त्यांना पुरेपूर न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. त्यासोबतच अंगणवाडी सेविकांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत पाठिंबा असेल", असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले.