मुंबई : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दुय्यम दर्जाचे खाते मिळाल्यामुळे वडेट्टीवार नाराज आहेत. वडेट्टीवार यांनी अद्याप आपल्या पदाचा पदभार स्वीकारला नाही. तसेच खातेवाटप झाल्यापासून वडेट्टीवार मंत्रालयात फिरकलेच नाहीत. त्यामुळे वडेट्टीवार यांनी उघड नाराजी दर्शवली आहे. ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहून यावर शिक्कामोर्तब करतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वड्डेट्टीवार यांच्याकडे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन ही खाती आहेत. विरोधी पक्षनेते राहिलेल्या वडेट्टीवार यांना चांगले खाते मिळेल अशी अपेक्षा होती. पण मंत्रिमंडळ विस्तारात ती पूर्ण झाली नाही. विजय वडेट्टीवार यांची खाती तुलनेने कमी महत्वाची आहेत. त्यामुळे वडेट्टीवार नाराज आहेत.



पक्षाने डावलले 


राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभा सदस्याचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांना नेमले. पक्षाच्या पडत्या काळात त्यांनी मोठी जबाबदारी पेलली आहे. मोठे नेते असताना दुय्यम खाती देऊन पक्षाने डावलल्याची भावना त्यांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांनी अद्याप पदभार स्वीकारला नाही. तसेच ते मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.