मुंबई : जम्मू -काश्मीर राज्याबाबत आज केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत कलम 370 हटवले आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चर्चा न करता असा निंर्णय घेणे योग्य नसल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे देशात लोकशाही आहे की नाही ? असा प्रश्न उपस्थित झाला असून यापुढे लोकशाही टिकवण्यासाठी काम करावे लागेल असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली. लोकशाहीत कोणताही निर्णय हा चर्चा करून घेतला जातो. मात्र स्थानिकांच्या भावना लक्षात न घेता भाजपला फायदेशीर निंर्णय केंद्र सरकारने घेतल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.



गृहमंत्र्यांचे निवेदन 


मोदी सरकारने सोमवारी संसदेत काश्मिरमधील कलम ३७० आणि कलम ३५ अ रद्द करण्याचा ऐतिहासिक प्रस्ताव मांडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात राज्यसभेत निवेदन दिले. यानंतर राज्यसभेत विरोधकांचा एकच गोंधळ पाहायला मिळाला. काश्मीरमधील कलम ३५ अ हटवण्याच्या निर्णयाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही मंजुरी दिली आहे. 


हे दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीर राज्याला लाभलेला स्वायत्त राज्याचा दर्जा संपुष्टात येणार आहे. या बरोबरच जम्मू आणि काश्मीरमध्ये संपत्ती खरेदीचा आणि गुंतवणूक करण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. याशिवाय राज्याच्या कायद्यात केंद्र सरकारला हस्तक्षेपही करता येणार आहे.