लातूरमधील पतंजलीच्या सोयाबीन प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध
विलासराव देशमुख यांच्या स्वप्नातील प्रकल्पाशिवाय इतर कुठल्याही प्रकल्पाला आपला विरोध
शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर: औसा तालुक्यातील टेम्बी येथे रामदेव बाबांच्या पतंजलीच्या सोयाबीन प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच हिरवा कंदील दाखविला. मात्र, टेम्बीच्या प्रस्तावित सोयाबीन प्रकल्पाला आता काँग्रेसने विरोध दर्शविला आहे.
काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख हे अवजड उद्योग मंत्री असताना त्यांनी भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड अर्थात 'भेल'चा मोठा प्रकल्प आणला होता. या प्रकल्पासाठी १८०० हेक्टर जमीनही संपादित करण्यात आली होती. त्यामुळे विलासराव देशमुख यांच्या स्वप्नातील प्रकल्पाशिवाय इतर कुठल्याही प्रकल्पाला आपला विरोध असल्याचे काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा विद्याताई पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
'भेल'च्या प्रकल्पामुळे १० हजार बेरोजगारांना काम मिळणार होते. मात्र, पतंजलीतून एक हजार लोकांनाही काम मिळणे अवघड आहे. मुख्यमंत्र्यांनी रामदेव बाबा सोबत नांदेडमध्ये योगदिनी योग केल्यानंतर पतंजलीचा सोयाबीन प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखविल्याचा आरोपही यावेळी विद्याताई पाटील यांनी केला.
मुळात विलासराव देशमुख यांच्या तर निधनानंतर 'भेल' चा प्रकल्प गुंडाळला गेला. त्यानंतर औसा तालुक्यातील टेम्बी येथे रेल्वे बोगीचा प्रकल्प येण्याची चर्चा झाली. तो प्रकल्पही लातूरला गेला. त्यामुळे टेम्बीची संपादित जमीन रामदेवबाबांच्या पतंजलीच्या देण्याचा निर्णय घेऊन सोयाबीन प्रकल्प उभारण्याचे पत्रही मुख्यमंत्र्यांनी रामदेवबाबांना दिले होते. यासाठी राज्य सरकारने विविध सवलतीही पतंजलीला देण्याचे मान्य केले आहे. मात्र, वेळप्रसंगी याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशाराही काँग्रेसने दिला आहे.