`म्हणून भाजपने दूधदर आंदोलनाची तारीख बदलली`, काँग्रेसचा निशाणा
राज्यातल्या दूध दरांसाठी भाजपने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर काँग्रेसने टीका केली आहे.
मुंबई : राज्यातल्या दूध दरांसाठी भाजपने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर काँग्रेसने टीका केली आहे. महाराष्ट्र द्रोह करण्यापेक्षा मोदींकडे राज्यासाठी मदत मागा, असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले आहेत.
'कोरोनाच्या कठीण संकटात सरकारला मदत करण्याऐवजी अडचणी वाढवण्यात भाजपा नेत्यांना रस आहे. असा 'महाराष्ट्र द्रोह' करण्यापेक्षा मोदींकडे राज्यासाठी आर्थिक मदत मागा. भाजपाचे सरकार असताना दुध उत्पादक शेतकऱ्यांची काय दुरावस्था केली होती हे महाराष्ट्र जाणतो. भाजपाचा जाहीर निषेध!', असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.
भाजपने दुध दरवाढीसाठी १ ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली होती. पण पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी दुधाच्या प्रश्नावर २१ जुलै रोजी बैठक बोलावल्यामुळे भाजप लगबगीने सोमवारी आंदोलन करत आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.
भाजप किती खालच्या पातळीवर उतरणार आहे? शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा असंतोष निर्माण करुन गलिच्छ राजकारण करणे हाच उद्देश आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.
दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रुपये अनुदान थेट त्यांच्या बँकेत जमा करावं. दुध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रती किलो ५० रुपये अनुदान, गायीच्या दुधाला ३० रुपये दर द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.