पुणे : भाजप आमदार राम कदम यांनी महिलांबाबत बेताल वक्तव्य केल्यानंतर महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. राज्यात जोडोमारो आंदोलनही करण्यात आले. तसेच राजकीय वर्तुळातूनही जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात ठाण मांडले. आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदार राम कदम यांना जोरदार फटकारलेय. मुली पळवून नेणं हे त्याच्या बापाच्या घरचं आहे का? असा थेट हल्लाबोल केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने आयोजित बाबुरावजी घोलप पुरस्कार प्रदान समारंभात अजित पवारांनी राम कदम यांच्यावर टीका केली. पक्षाचा एक आमदार महिलांबाबत असे बोलतो. मात्र, पक्षाचे प्रमुख लोक काही बोलू शकत नाहीत हे आणखी घातक आहे. यावर माफी मागणे तर दुरच, पण खेद काय व्यक्त करतात, दिलगिरी काय व्यक्त करतात, असे सांगत अजित पवार यांनी राम कदामांवर सडकून टीका केली.



मुलीना शिकवायला पुढाकार घेतला. त्या मुलांच्या पुढं गेलं. सरकार म्हणतंय बेटी बचाव आणि बेटी पढाव आणि यांचा एक निर्लज्ज आमदार म्हणतोय पोरगी पळवून आणू ,तुझ्या काय बापाची ठेव आहे का? कशाची मस्ती आली आणि भाजपचे प्रवक्ते म्हणून मिरवतात. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे, असे अजित पवार म्हणालेत.



जिथे महिलांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न झालाय, तिथे समाज पुढे गेला आहे. इथे  वाट्टेल तशी बेताल वक्तव्य काहीजण करतात. मात्र, त्यांना पाठिशी घालण्यात येत आहे. अशा प्रकारची वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या पक्षातील लोकं काही मत मांडू शकत नाही, हे समाजासाठी घातक आहे, असे अजित पवार म्हणालेत.