Pune Lok Sabha Election : भाजपला टक्कर देण्यासाठी एकीकडे महाविकास आघाडीने (Mahavikasaghadi) वज्रमुठ यात्र काढली आहे तर, दुसरीकडे पुण्यात मात्र, वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.  काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वादाची ठिणगी पडणार आहे. पुण्यातील लोकसभेच्या अत्यंत महत्वाच्या जागेवरुन हा वाद पेटणार आहे (Maharashtra Politics).  लोकसभेच्या जागेवर काँग्रेस सोबत राष्ट्रवादीने देखील दावा केला आहे. 
पक्षाने संधी दिल्यास पुण्यातील लोकसभेची पोट निवडणूक लढवण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दाखवली आहे. गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर जगताप यांचे पोस्टर भावी खासदार म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात हा प्रकार केल्याचं जगताप यांचं म्हणणं आहे. असं असलं तरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पुण्याची जागा काँग्रेसकडे आहे. 


गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या मोहन जोशींचा गिरीश बापट यांनी पराभव केला होता. आता पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. असं असताना राष्ट्रवादीकडूनही उमेदवारीचा आग्रह धरला गेल्यास दोन पक्षांमध्ये वितृष्ट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


दरम्यान, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या श्रद्धांजली सभेआधीच निवडणुकीची चर्चा करणं पुण्याच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी नसल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेस याबाबतची भूमिका स्पष्ट करणार असल्याच शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी म्हटल आहे.


पुण्यात मविआची जबरदस्त खेळी, पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकरांना उतरवणार?


कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीनं भाजपला जोर का झटका दिला. तब्बल 32 वर्षं भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यामधून महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर विजयी झाले. आता पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचं महाविकास आघाडीनं ठरवल . पुणे लोकसभेची जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. त्यामुळं कसब्यात जायंट किलर ठरलेल्या धंगेकरांनाच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची काँग्रेसची तयारी असल्याचं समजतंय. त्यामुळं भाजपचं टेंशन चांगलंच वाढलंय.