Chhagan Bhujbal on Maratha Reservation : सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध करत, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, अन्यथा ओबीसींनी रस्त्यावर उतरुन विरोध करावा, अशी निर्वाणीची भाषा छगन भुजबळांनी केली होती. भुजबळांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिकेनंतर जरांगे-पाटीलही आक्रमक झाले. त्यात आता महायुतीतल्या नेत्यांमध्येही वादावादी सुरु झाली आहे. छगन भुजबळांना अजित पवारांनी समज द्यावी अशी आक्रमक भूमिका उत्पादन शुल्क मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाईंनी घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भुजबळांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीनंही कानावर हात ठेवलेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही पक्षाची भूमिका असल्याची प्रतिक्रिया अजित पवार गटाकडून आलीय. ओबीसी नेते म्हणून भुजबळांनी भूमिका घेतली असेल असं अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफांनी म्हटलंय.


मंत्री छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाला विरोध केला असला तरी पक्षातूनच त्यांना विरोध होण्याची शक्यता आहे... मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही पक्षाची भूमिका असल्याची प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलीय. तर सरकारमधल्या मंत्र्यांमध्ये एकवाक्यता असावी असा टोला जयंत पाटलांनी लगावलाय. 


महायुतीतून भुजबळांना विरोध का?


मराठा आरक्षणासाठी महायुतीचे नेते आग्रही आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. मराठा आरक्षण मिळावं ही अजित पवारांसह राष्ट्रवादीचीही भूमिका आहे. भुजबळांची भूमिका राष्ट्रवादीसह महायुतीलाही अडचणीत आणणारी आहे.  भुजबळांच्या आक्रमक भूमिकेमुळे मराठा समाज दुखावतोय.  छगन भुजबळांच्या विधानांवर भाजपनं वेट अँड वॉचची भूमिका घेतलीय. शिंदे गट भुजबळांविरोधात आक्रमक झालाय तर राष्ट्रवादी अजित पवार गटानं भुजबळांना घरचा आहेर दिलाय. त्यामुळे महायुतीत छगन भुजबळ एकटे पडल्याचं चित्र आहे.


भुजबळांच्या भूमिकेला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा पाठिंबा


मराठा आरक्षणाविरोधातल्या छगन भुजबळांच्या भूमिकेला राष्ट्रीय ओबीसी महासंघानेही पाठिंबा दिलाय..मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी महासंघाने विरोध केलाय. तेव्हा भुजबळांच्या भूमिकेमुळे ओबीसींच्या आंदोलनाला बळ मिळाल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय.


मराठा तरुणांच्या विरोधात ओबीसी नेते जाणूनबुजून षडयंत्र करत  असल्याचा जरांगे यांचा आरोप


मराठा तरुणांच्या विरोधात ओबीसी नेते जाणूनबुजून षडयंत्र करत असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केलाय. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केलीय. तर भुजबळांच्या पाहुण्यांचं बीडमधील हॉटेल त्यांच्याच कार्यकर्त्यांनी फोडल्याचाही आरोप जरांगे पाटलांनी केलाय.