मुंबईनंतर आता नाशिकमध्येही रंगला पावसाळी गटारांचा मुद्दा
पावसाळी गटार योजनेवरून महासभेत विरोधक लक्षवेधी मांडणार आहेत. तसंच या योजनेत गैरव्यवहारही झाल्याचा आरोप केला जातोय.
किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक: मुंबईनंतर आता नाशिकमध्येही पावसाळी गटारांचा मुद्दा रंगू लागलाय. पावसाळ्याच्या सुरूवातीलाच काही भागात पाणी तुंबलं. त्यामुळे उरलेल्या पावसाळ्यात काय होणार याची चुणूक नाशिककरांना दिसून आलीय. पावसाळी गटार योजनेवरून महासभेत विरोधक लक्षवेधी मांडणार आहेत. तसंच या योजनेत गैरव्यवहारही झाल्याचा आरोप केला जातोय.
अनेक भागात पावसाचं पाणी तुंबलं
नाशिक शहरात अनेक भागात पावसाचं पाणी तुंबलं. त्यामुळे पावसाळी गटार योजनेवरून वाद पेटलेत. अधिकाऱ्यांवर नगरसेवक नाराज असून आदेश देऊनही कामं होत नसल्याची तक्रार आहे. गटारीचं आणि ड्रेनेजचं पाणी सररासपणे गोदावरीत सोडलं जातंय. याशिवाय मलनिस्सारण योजनेतही गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. शहरात पाणी साचलेलं दिसत असलं तरी प्रशासनाने सर्व तयारी केल्याची टिमकी सत्ताधारी वाजवत आहेत.
वारंवार निविदा काढूनही शहराची तुंबापूरी
वारंवार निविदा काढूनही शहरात पाणी तुंबण्याची समस्या मिटत नाही. सत्ताधारी भाजपकडून गोदावरी स्वच्छतेचा डिंगोरा पिटला जातोय. मात्र नाशिककर मात्र तुंबलेल्या पाण्यात धडपडतच आहेत.