Udyanraje Painting Controversy: राज्यात धुळवड सण साजरा होत असताना साताऱ्यात (Satara) एका नवीन वादाला तोंड फुटलं आहे. या वादामुळे साताऱ्यात एक वेगळीच धुळवड (Holi) सुरू झाली आहे. भाजपा खासदार उदयनराजे (Udyanraje Bhosle) यांच्या भिंतीचित्रावरुन हा वाद रंगला आहे. राज्याचे मंत्री शंभूराज देसाई (Shamburaj Desai) यांनी हे चित्र काढण्यास विरोध केला आहे. दरम्यान, या वादात शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांनीही उडी घेतली आहे. याची चर्चा राज्यसभेत होणार असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाच्या शेजारी असलेल्या इमारतीवर उदयनराजेंच्या समर्थकांना त्यांचं चित्र काढायचं आहे. यासाठी गेल्या तीन दिवसांपासून ते प्रयत्न करत आहेत. शंभूराज देसाई यांचा मात्र हे चित्र काढायला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. काहीही झालं तरी उदयनराजे यांच्या समर्थकांना हे चित्र काढू दिले जाणार नाही याचा बंदोबस्त देसाई यांनी केला आहे. शंभूराज देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मात्र कोणताही वाद नसल्याचं म्हटलं आहे.


दुसरीकडे उदयनराजे समर्थकांनी काहीही झाले तरी हे चित्र काढण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी त्यांनी शंभूराज देसाई यांची भेट घेतली. ही भेट सकारात्मक झाल्याचं उदयनराजेंच्या समर्थकांनी सांगितलं आहे. 


उदयनराजे आणि शंभूराज देसाई यांच्या वादात शिवेंद्रराजे यांनीही उडी घेतली आहे. उदयनराजे यांच्या चित्राचा वाद हा महाराष्ट्र ,कर्नाटक सीमावाद आणि जम्मू-काश्मीरच्या वादापेक्षाही गहन आहे. याची चर्चा राज्यसभेत होणार आहे असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे. भिंतीवर उदयनराजेंचं चित्र काढण्यापेक्षा अजिंक्यतारा किल्ल्यावरच काढा असाही टोला त्यांनी लगावला आहे. 


दरम्यान या वादात पोलीस मात्र भरडले जात आहेत. आता उदयनराजे यामधून माघार घेणार की शंभूराज देसाईंच्या प्रतिष्ठेसाठी ठरलेला हा मुद्दा शांत होणार हे पाहावं लागणार आहे.