जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : रणरणत्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना आता दिलासा मिळणार आहे. नागपूर वाहतूक विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना 'कुल वेस्ट जॅकेट' देण्यात आलंय. राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग राबवण्यात येतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरच्या चौकाचौकात दिसणाऱ्या वाहतूक पोलिसांचे हे गणवेश पाहून नागपूरकर थोटे अचंबित होत आहेत. कारण नेहमी दिसणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या शर्टवर हे पोलीसदादा राखाडी रंगाचं जॅकेट घालून वाहतूक सांभाळत आहेत. उन्हापासून पोलिसांचं रक्षण करण्याचं महत्त्वाचं काम हे जॅकेट करणार आहे. नागपूरचा पारा ४० अंशांवर पोहोचलाय. अशा स्थितीत रस्त्यावर उभं राहून दुपारी वाहतूक नियंत्रण जिकीरीचं झालंय. त्यासाठी वाहतूक पोलिसांना कूल वेस्ट जॅकेट देण्यात आली आहेत.


वॉटर प्रूफ कापडापासून हे जॅकेट तयार करण्यात आली आहेत. परिधान करण्यापूर्वी जॅकेट पाण्यात भिजवली जातात. जास्तीचं पाणी काढून घेतल्यावर अंगावर घातलं की थंड वातावरणाचा अनुभव येतो. एकदा भिजवलं की जॅकेट ४ ते ५ तास थंड राहतं. 


बाहेरच्या तापमानापेक्षा ६ अंशाने कमी तापमानाचा अनुभव या जॅकेटमुळे मिळतो. वजनाला अतिशय हलकं असल्यामुळे हाताळण्यास सुलभ असं हे जॅकेट पोलिसांना फारच उपयोगी आहे.