corona Update News : तर कठोर निर्णय घ्यावे लागतील, अजित पवार यांचे संकेत
रेल्वेत होत असलेल्या गर्दीबाबत मुख्यमंत्री गंभीर
सातारा : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढायला लागली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.
पश्चिम बंगालमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढायला लागल्यावर लॉकडाऊन लागू केला आहे. देशातील काही राज्यांमध्येसुद्धा नाईट कर्फ्यू सारखे निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.
राज्यातील कोरोनाचा आकडा हा 10 हजारांकडे वाटचाल करत आहे. सध्या राज्यात 8 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. तसेच ओमायक्रॉनचे रुग्णही वाढत आहे. अशीच रूग्णसंख्या वाढली तर नियम कठोर करु, तारतम्य बाळगा, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
महाराष्ट्रात निर्बंध लागू शकतात?
दरम्यान, पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रातही कठोर निर्बंध लागू शकतात असा इशारा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी दिला आहे. तसंच शाळा, कॉलेज आणि लोकलसंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील असंही वडेट्टीवर यांनी म्हटलं आहे. मंत्रीमंडळ बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा होणार असल्याचं वडेट्टीवर यांनी स्पष्ट केलं आहे.
गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार असून त्यासाठी कडक कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. रेल्वेत होत असलेल्या गर्दीबाबत मुख्यमंत्री गंभीर आहेत, पण तो निर्णय कधी घ्यायचा हे टास्कफोर्ससोबत चर्चा करुन होईल असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.
तसंच कोरोना रुग्णसंख्या जास्त असलेल्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करण्याचा एक पर्याय असू शकतो असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.