सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : पंढरीच्या सावळया विठूरायाच्या भेटीसाठी शेकडो वर्षापासून निघणारी पालखी परंपरा खंडीत होणार नाही. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संबधित प्रमुखांची व्हिडिओ काॅन्फरन्सिंग द्वारे बैठक झाली. या मध्ये हा निर्णय घेतला आहे. शासनासोबत चर्चा झाल्यानंतर ठरणार अंतिम तोडगा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राची अध्यात्मिक परंपरा असलेला पालखी सोहळा दरवर्षी नित्यनेमाने आळंदी आणि देहू मधून पंढरपूर कडे प्रस्थान ठेवतो. वीस दिवसांच्या काळात वाटेवरच प्रत्येक गाव टाळ,मृदूंग आणि अभंगात तल्लीन होते. पंढरपूरात पोहचल्यानंतर आषाढी एकादशी चा सोहळा साजरा होतो


यंदा एक जुलै ला आषाढी एकादशी आहे. या साठी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे १३ जून आणि संत तुकाराम महाराज पालखीचे १२ जून ला नियोजित प्रस्थान आहे. पण सध्या सगळीकडे कोरोना व्हायरस पसरल्याने पालखी पंढरपूरला जाण्यासाठी निघणार का? याबाबत संभ्रम होता.


पण ६ मे २०२० ला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संबधित प्रमुख लोकांची व्हिडिओ काॅन्फरन्सिंग द्वारे बैठक झाली. यामध्ये ऍड. विकास ढगे पाटील, बाळासाहेब आरफळकर, उर्जितसिंह शितोळे सरकार, देवव्रत वासकर महाराज, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, मारूती महाराज कोकोटे, राजाभाऊ चोपदार इत्यादी लोक सहभागी होते.


पालखी सोहळा संबंधितांची चर्चा जवळपास एक तास सुरू होती. सर्वांचा एकच सूर होता की पालखी पंढरपूरला नेण्याची परंपरा खंडीत होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. सध्या कोरोना व्हायरसमुळे सगळीकडे लाॅकडाऊन, संचारबंदी आहे. अशा काळात पालखी पंढरपूरात नेणे दरवर्षी प्रमाणे सहज शक्य नाही. याबाबतही विचार विनिमय झाला.


पालखी प्रस्थान करायचे असेल तर शासनाशी चर्चा झाली पाहिजे. यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संबधित दोन लोक शासनाशी चर्चा करतील. आळंदी मधून प्रस्थान करताना शासन ठरवेल ते नियम पाळत पालखी पंढरपूरला पोहचवणे. पालखी सोबत गर्दी टाळण्यासाठी, सध्याच्या परिस्थितीचे भान ठेवत कमीत कमी लोक असणे. ही संख्या कमीत कमी दहा लोक ही असू शकते. अथवा शासन सांगेल तेवढेच लोक सोबत असतील. पालखी दरवर्षी प्रमाणे रस्त्यावरून पायी चालत येण्यावर सगळे ठाम आहेत.


शेकडो वर्षांची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी हा सोहळा घडू द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आषाढी साठी जरी पालखी पंढरपूरात आली तरी पंढरपूरात दरवर्षी प्रमाणे वारीसाठी येणारे लोक असणार नाहीत.  फक्त माऊलींच्या पादूकांची आणि विठूरायाची भेट घडावी आज पर्यंत सुरू असलेली परंपरा अबाधित राहावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  आता निर्णय शासन घेणार आहे.