कोरोनाचा कहर : मदतीच्या नावाखाली चमकोगिरी करणाऱ्यांवर कारवाई, महाराष्ट्र सायबरचेही लक्ष
समाज माध्यमांचा दुरुपयोग करून काही विघ्नसंतोषी लोकांकडून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करु नका, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
मुंबई /लातूर : मदतीच्या नावाखाली चमकोगिरी करणाऱ्यांवर आता पोलीस कारवाई करणार आहेत. मदतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. सरकारच्यया आदेशाने फोटोबाजांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, समाज माध्यमांचा दुरुपयोग करून काही विघ्नसंतोषी लोकांकडून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा, समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न. त्यांच्यावर महाराष्ट्र सायबरचे लक्ष आहे. असे काही करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, असे स्पष्ट संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या संकटात गोरगरिबांचे हाल सुरू झालेत. अशा गरजूंच्या मदतीसाठी लाखो हात पुढं आलेत. मदत करणाऱ्या दानशूर लोकांमधे काही चमकोंनीही घुसखोरी केलीय. चार आण्याची मदत करायची आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल करायचे असा प्रकार सुरु आहे. त्यामुळं मदत नको पण फोटोसेशन आवर असं म्हणण्याची वेळ सामान्यांवर आलीय. त्यामुळंच प्रशासनानं आता मदतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
मदत करा पण त्याचं एवढं मार्केटिंग करु नका की मदत घेणाऱ्याला अपमानास्पद वाटेल. मदत घेणाऱ्याला तुमचा अभिमान वाटेल असं वागा आणि त्याला वागणूक द्या, असे आवाहन करण्यात येत आहे. कोरोनामुळे प्रत्येक जण संकटात आहे. त्यामुळे त्यामुळे दुसऱ्याला संकोट वाटेल असे कृत्य करु नका, नाहीतर कारवाई होण्यास सज्ज राहा, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.