पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी लॉकडाऊनचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश केंद्रीय पथकाने दिले आहेत. वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी केंद्रीय स्तरावरील पथक काल पुण्यात दाखल झाले. या पथकाने कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण या अनुषंगाने माहिती जाणून घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातल सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. मुंबई आणि पुणे येथील परिस्थितीगंभीर बनत चालली आहे. त्यामुळे केंद्रीय पथक राज्यात दाखल झाले आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्यावतीने हे पथक माहिती घेणार आहे. बाधित रुग्णांच्याबाबतीत मुंबईनंतर पुण्याचा क्रमांक लागतो. या मागील वस्तुस्थिती केंद्रीय पथकाने जाणून घेतली. यावेळी केंद्रीय मंत्रालयाचे अपर सचिव संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले की, सर्व विभाग समन्वयाने काम करीत आहे, ही समाधानाची बाब असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, तसेच अन्न आणि धान्याचे वितरण व्यवस्थित करावे आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा, अशी सूचना केली.


या पथकामधील केंद्रीय मंत्रालयाचे अपर सचिव संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे सह सल्लागार डॉ. पवनकुमार सिंग, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे संचालक करमवीर सिंग, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे उपसचिव डॉ. आशिष गवई, आरोग्य सेवेचे अतिरिक्त महासंचालक पी.के.सेन हे उपस्थित होते.


बैठकीच्या सुरुवातीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागाची माहिती दिली. विभागात पुणे शहरात प्रमाण अधिक आहे. एक तर येथील लोकसंख्या आणि झोपडपट्टीचे कारण असले तरी ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये ५५ ते ७० वयोगटातील संख्या अधिक आहे. शिवाय बहुतांशी लोकांना उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी प्रशासनाने अगदी सुरुवातीपासूनच खबरदारी घेत आहे, असे ते म्हणालेत.


कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता शहरातील सर्व रुग्णालये सक्षम केली आहेत. विविध पथके निर्माण करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु आहे. काही दिवसांत परिस्थिती निश्चित नियंत्रणात येईल, असा विश्वास डॉ. म्हैसेकर यांनी व्यक्त केला.


पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम् यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आणि लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीसाठी पोलीस करीत असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती दिली. तसेच लोकांमध्ये जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपपक्रमांबद्दलही सांगितले. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आमच्या भागात उद्योग व आय.टी.कंपन्या मोठ्या प्रमाणात आहे. तथापि, कायदा व सुव्यवस्था सुरळीत असल्याचे सांगितले.


पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड व अपर आयुक्त रुबल अग्रवाल यांनी शहरातील आरोग्य विषयक परिस्थितीची माहिती देताना शहरातील रुग्णालय सक्षम केले असून काही रुग्णालयांबरोबर करार करण्यात आला आहे. भविष्यात  कोरोनाच्या अनुषंगाने गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर आपली तयारी असावी, अशा पध्दतीने नियोजन केले असल्याचे स्पष्ट केले.


जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ससून रुग्णालय अंतर्गत अकरा मजली इमारतीत नव्याने कोविड रुग्णालय विक्रमी वेळेत सुरु केले. आरोग्याबरोबरच अडकून असलेल्या मजूर व कामगारांची निवास व भोजनाची व्यवस्था प्रशासन व विविध संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात कोरोनाला अटकाव करण्यात यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुणे ग्रामीण भागाची माहिती दिली.तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनीही केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.