पुणे : दिल्लीतील धार्मिक सभेत सहभागी झालेल्या अनेकांची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भटकंती सुरु आहे. औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, पिंपरीसह अहमदनगरमध्येही संशयित रुग्ण आढळल्याने प्रशासनाची धावाधाव सुरु झाली आहे. आता पुणेकरांसाठी धक्कादायक बातमी आहे. दिल्लीत निझामुद्दीनगरच्या कार्यक्रमात सहभागी झालेले १३० हून अधिक जण पुणे आणि परिसरात असल्याचे  समोर आले आहे. यात ६० जणांना क्वॉरंटाईन करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. तर उर्वरित लोकांना शोधण्याचे आव्हान पुणे पोलीस आणि प्रशासनासमोर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 तर दिल्लीतून आलेले १४ संशयित पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलेत. तर आणखी १८ जणांचा शोध सुरू करण्यात आला आहे. तर अहमदनगरचे ३४ जण निझामुद्दीन मरकज कार्यक्रमात सहभागी झाल्याचीही माहिती समोर येत आहे. तसेच रत्नागिरीत दिल्लीतल्या निजामुद्दीन मरकजमधील कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील ८ ते १० जण आल्याची माहिती मिळत आहे. त्यांचा पोलिसांकडून शोध सरु आहे. त्या त्या तालुक्यातील तहसीलदारांकडून पोलिसांच्या मदतीने या सगळ्यांचा शोध सुरु आहे. या आठ ते दहा जणांचा सहभाग ही जिल्ह्यात चिंता वाढवणारी बाब ठरले आहे.


तबलिग-ए- जमातमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले ४७ जण औरंगाबाद शहरात परत आलेत. आतापर्यंत ४० जणांची तपासणी करण्यात आली आहे. सोमवारी गांधीनगर भागातील सात जणांना क्रांती चौक पोलिसांनी घाटी रुग्णालयात भरती केले. अन्य दोघांचा शोध सुरू आहे. या सातपैकी सहाजण लग्नाला गेले होते, असे पोलिसांनी सांगितले. तर अहमदनगरमधील ३४ जणांनी निजामुद्दीनच्या  तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. 


त्या सर्वांचे सँम्पल कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी २४ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून दोन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झाले आहे. उर्वरित १० जणांचे रिपोर्ट अजूनही आलेले नाहीत. ज्या दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांचे सँम्पल्स आता तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. तर उर्वरित २२ जणांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येणार आहे.