मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट कायम आहे. कोविड-१९चा फैलाव होत आहे. आता ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. मात्र, आजही ग्रामीण भागात म्हणाव्या तशा सोयी-सुविधा नसल्याची बाब पुढे येत आहे. आता गणपतीचा सण काही दिवसांवर आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, वसई, नालासोपारा, नवी मुंबई येथून अनेक गणेश भक्त कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज निर्माण झाली आहे. काही ठिकाणी सुसज्ज सरकारी रुग्णालये उभारण्यात आली आहेत. मात्र, काही ठिकाणी अद्याप सोयी-सुविधांचा अभाव दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात साखरपा आरोग्य केंद्र त्यापैकी एक आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी जिल्ह्यातील कोल्हापूर - रत्नागिरी या राज्य मार्गावर साखरपा येथे आयुष्मान भारत योजनेतून अत्याधुनिक आरोग्य वर्धिनी केंद्र उभारण्यात आले आहे. या मार्गावर अपघातातही घडत असतात. अपघातग्रस्तांना तात्काळ उपाचारही मिळणे आवश्यक आहे.तसेच सध्या, कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर येथे सोयी-सुविधांचा अभाव दिसून येत आहे. याठिकाणी केवळ एक डॉक्टर उपलब्ध आहे. तेही कोविडच्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे अन्य आजारांसाठी डॉक्टरच उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे जावे लागते. मात्र, त्यांची फी सामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर असल्याने येथे आणखी डॉक्टरांची नियुक्ती करावी आणि किमान सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी पंचक्रोशीतील ४० गावांतील नागरिकांकडून करण्यात आली आहे.



साखरपा आरोग्य केंद्रात एकच डॉक्टर सध्या कार्यरत आहे. मात्र, या डॉक्टरांवर अन्य कामे सोपविण्यात आली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात होत आहे. साखपा पंचक्रोशीत ४० गांवाचा समावेश आहे. या सर्व गावांसाठी साखरपा आरोग्य केंद्रावरच अवलंबून राहावे लागते. साखरपा आरोग्य वर्धिनी केंद्रात एक्स रे मशिनची व्यवस्था नाही. ईसीजीची सुविधा नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना या आरोग्य वर्धिनी केंद्रात आल्यानंतर अन्य डॉक्टरांकडे जाण्यास सांगितले जाते. तेथे एक्स रे काढा, ईसीजी काढा नंतर येथे या, असे सांगण्यात येते. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. तसेच  वेळ आणि पैसा अधिक खर्च होतो. अत्याधुनिक इमारत उभी करताना साध्या साध्या गोष्टींसाठी खासगी दवाखाण्यात जावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ही वास्तू काय शोभेसाठी उभी आहे का, असा संतप्त सवाल येथे येणाऱ्या काही रुग्णांनी उपस्थित केला.


सध्या लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या हाताला काम नाही. पंचक्रोशीतील ४० गावांतील काही हाताच्या बोटावर सोडले तर अनेकांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट आहे. त्यामुळे सरकारी आरोग्य केंद्रात उपचारासाठी आल्यानंतर खासगी डॉक्टरांकडे जाणे त्याला परवडत नाही. त्यामुळे साखरपा आरोग्य वर्धिनी केंद्रात चांगल्या सोयी-सुविधांसह किमान आणखी एका डॉक्टरची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी पंचक्रोशीतील गरीब नागरिकांनी केली आहे.