कोरोनाचा धोका टाळण्यासाठी नाशिकच्या टोलनाक्यावर प्रवाशांचं स्क्रिनिंग
जगभरामध्ये धुमाकूळ घातल्यानंतर कोरोनाने भारतातही एन्ट्री केली आहे.
नाशिक : जगभरामध्ये धुमाकूळ घातल्यानंतर कोरोनाने भारतातही एन्ट्री केली आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्वाधिक ४० रुग्ण सापडले आहेत. नाशिकमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडलेला नसला, तरी धोका टाळण्यासाठी प्रशासनाने पावलं उचलली आहेत. नाशिकमधल्या टोलनाक्यावर ड्रायव्हरसह प्रवाशांची नॉर्मल स्क्रिनिंग होणार आहे.
टोलनाक्यावर प्रत्येकाला तपासणी करुन चिठ्ठी देण्यात येणार आहे. संशयित कोरोना रुग्णांच्या माहितीसाठी हा नवा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरांसाठी वेगळ्या सूचना नाही, सगळ्यांना एकत्रितपणे सूचना दिल्या आहेत. कुठल्याही दुकानात किंवा संस्थेत गर्दी होत असेल तर काळजी घ्या, नाहीतर बंद करा, असं आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केलं आहे.
धार्मिक स्थळाबाबत चॅरिटी कमिशनर यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी या गोष्टी गांभिर्याने घेऊन तातडीने त्याची अंमलबजावणी करावी, अन्यथा मला माझ्या पद्धतीने निर्णय घ्यावा लागेल, अशा कडक शब्दात नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भूमिका घेतली आहे.