मुंबई : राज्य सरकारने २० एप्रिलपासून दिलेली लॉकडाऊनची शिथिलता मुंबई आणि पुण्यात रद्द करण्यात आली आहे. मुंबई आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी हा नियम बदलण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात २० एप्रिलपासून काही सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यानंतर नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरू केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधताना याबाबत नाराजीही व्यक्त केली होती. तसंच निर्बंध न पाळल्यास शिथिलता रद्द केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याची अधिसूचना राज्य सरकारने १७ एप्रिलला जाहीर केली होती. पण आता मुंबई आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी शिथिल केलेल्या बाबी रद्द करणारी दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे आता मुंबई, पुणे महानगर क्षेत्रात १७ एप्रिलआधीची अधिसूचना लागू होईल.


या सुविधा बंद होणार


- ई कॉमर्स कंपन्यांना  इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची वाहतूक करण्यास दिलेली शिथिलता रद्द


- फरसाण, मिठाईची दुकाने, कन्फेक्शनरी दुकाने बंद राहणार


- बांधकामे देखील मुंबई आणि पुण्यात बंदच राहतील


- माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम पद्धतीनेच काम करून घ्यायचे


- राज्यभरात  वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते मास्क, जंतू नाशक हाताला लावून तसेच सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील, पण मुंबई आणि पुणे पालिका क्षेत्रात तसेच कंटेनमेंट क्षेत्रात वितरण करण्यावर प्रतिबंध राहील.