मुंबई : केरळला मागे टाकत महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण झाले आहेत. महाराष्ट्रातली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ९७ वर पोहोचली आहे. सांगलीच्या ४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सांगलीच्या एकाच कुटुंबातील लोकं हज यात्रेसाठी गेले होते. त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. या चौघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या २३ने वाढली आहे. त्याआधी शनिवारी १२ नवे रुग्ण आणि रविवारी १० रुग्ण आढळले होते. मुंबईमध्ये कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आज फिलिपिन्सचा रहिवासी असणाऱ्या ६८ वर्षांच्या माणसाचा मृत्यू झाला.


महाराष्ट्राखालोखाल केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. केरळमध्ये आज कोरोनाचे २८ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे केरळमधली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ९५ झाली आहे. यातल्या ४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर उरलेल्या ९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे.


कोरोनामुळे भारतात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत ३, कर्नाटकमधील कलबुर्गी, बिहारमधील पटना, सुरत, कोलकाता आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एक व्यक्ती कोरोनामुळे मरण पावली.