धक्कादायक! राज्यात एकाच दिवसात कोरोनाचे ४,८४१ रुग्ण वाढले
राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येने नवा उच्चांक गाठला आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येने नवा उच्चांक गाठला आहे. २४ तासामध्ये राज्यात कोरोनाचे तब्बल ४,८४१ रुग्ण वाढले आहेत. मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा १३५०ने वाढला आहे. राज्यात एका दिवसात १९२ मृत्यूंची नोंद झाली. यातले १०९ मृत्यू मागच्या ४८ तासांमधील, तर उरलेले ८३ मृत्यू मागच्या कालावधीतील आहेत. सध्याचा राज्यातला मृत्यूदर ४.६९ टक्के एवढा आहे.
राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १,४७,७४१ एवढी झाली आहे. यातले ६३,३४२ रुग्ण हे ऍक्टिव्ह आहेत. आज ३,६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. आजपर्यंत एकूण ७७,४५३ कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातल्या बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ५२.४२ टक्के एवढं झालं आहे.
मुंबईमध्ये कोरोनाचे आज १,३५० रुग्ण सापडले आहेत, यामुळे कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ७०,८७८ एवढी झाली आहे. मुंबईमध्ये एका दिवसात ५८ मृत्यूंची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईतल्या एकूण मृत्यूंची संख्या ४,०६२ वर पोहोचली आहे.
तर कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाचे ३२३ रुग्ण वाढले आहेत. यामुळे कल्याण-डोंबिवलीमधल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ४,५२९ एवढा झाला आहे. मागच्या २४ तासामध्ये ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये आत्तापर्यंत ९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.