मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मागच्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनाचे ८२ नवे रुग्ण सापडले आहेत. कालपर्यंत २२० असलेले कोरोनाचे रुग्ण आज ३०२ पर्यंत पोहोचले आहेत. एका दिवसामध्ये मुंबईत सर्वाधिक ५९ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर अहमदनगरमध्ये ३ नवे रुग्ण सापडले. पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वाशी विरारमध्ये प्रत्येकी २-२ नवे रुग्ण आढळले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यामध्ये गेल्या २४ तासात कोरोनाग्रस्तांची संख्या अचानक झपाट्याने वाढली आहे. याचं प्रमुख कारण समोर आलं आहे. राज्यातल्या काही खासगी प्रयोगशाळांनाही कोरोना चाचणी करायला परवानगी देण्यात आली. पण गेल्या ५ दिवसांमध्ये या प्रयोगशाळांमधून चाचणी झालेले पॉझिटिव्ह रुग्ण यात धरले गेले नव्हते. आजच्या अहवालामध्ये ही संख्या एकत्रित देण्यात आली आहे. त्यामुळे एवढी संख्या वाढल्याचं आरोग्य विभागाचं म्हणणं आहे.


कोणत्या शहरात किती रुग्ण?


महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण ३०२ रुग्ण झाले आहेत. यापैकी मुंबईत १५१ रुग्ण, ठाणे मंडळात ३६ रुग्ण, नागपूरमध्ये १६ रुग्ण, पुण्यात ४८ रुग्ण, अहमदनगरमध्ये ८ रुग्ण, रत्नागिरीमध्ये १, औरंबादमध्ये १, यवतमाळमध्ये ४ , मिरजमध्ये २५, साताऱ्यात २, सिंधुदुर्गात १, कोल्हापुरात २, जळगावमध्ये १, बुलडाण्यात ३, नाशिकमध्ये १, गोंदियामध्ये १ रुग्ण आहे. तर गुजरातमधला १ रुग्णही महाराष्ट्रात आहे. राज्यात आतापर्यंत १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.