मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ९,३१८वर गेली आहे, तर एकूण ४०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण आढळले आहेत. आज दिवसभरात कोरोनामुळे ३१ जणांचा मृत्यू झाला आहे, यातील २५ मृत्यू एकट्या मुंबईतील आहेत. राज्यात एका दिवसात कोरोनामुळे पहिल्यांदाच एवढे मृत्यू झाले आहेत. याआधी काल कोरोनामुळे २७ जणांचा मृत्यू झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे मुंबईच्या धारावीमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. २४ तासांमध्ये धारावीत कोरोनाचे ४२ रुग्ण वाढले आहेत. तर एका दिवसात धारावीत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३३० वर पोहोचली आहे. धारावीमध्ये आत्तापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे.


मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार मागच्या २४ तासात मुंबईत २५ जणांचा मृत्यू झाला, तर कोरोनाचे ३९३ रुग्ण वाढले आहेत. मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ५,९८२ वर गेली आहे. मुंबईत आत्तापर्यंत २४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 


दादरमध्येही कोरोनाचे ४ रुग्ण वाढल्यामुळे एकूण संख्या ३३वर गेली आहे. तर माहिममध्येही कोरोनाचे ५ रुग्ण वाढले आहेत. माहिममध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३०वर पोहोचली आहे. 


दिवसभरात कुठे वाढली रुग्णसंख्या


- नवी मुंबईमध्ये आज रुग्णांच्या संख्येत धक्कादायक वाढ झाली आहे. एकाच दिवसात ४३ रुग्णांची वाढ झाली असून एकूण रुग्णांची संख्या १८८ वर पोहोचली आहे.


- रायगडमध्ये कोरोनाचे ३ नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची ८१ वर पोहोचली असून आतापर्यंत ३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


- बदलापूरमध्ये आणखी जण २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. येथे रुग्णांची संख्या २२ वर पोहोचली असून रामेशवाडी आणि कात्रप प्राणजी परिसर सील करण्यात आला आहे.


- यवतमाळमध्ये आणखी ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. येथे रुग्णांची एकूण संख्या ७५ वर पोहोचली आहे.


- अमरावतीत दिवसभरात कोरोनाचे ४ नवीन रुग्ण आढळले असून कोरोनाच्या रुग्णांची संख्या २७ वर पोहोचली असून आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.


- मालेगावात आज एकाच दिवसांत ४४ रुग्ण वाढले आहेत. मालेगाव मनपा भागात १७१ बाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत ७ जण बरे झाले तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे.


- कल्याण-डोंबिवलीत आज कोरोनाचे आणखी ६ रुग्ण वाढले आहेत. त्यापैकी ५ जण रोज मुंबईत अत्यावश्यक सेवा देण्यासाठी प्रवास करणारे आहेत.