मुंबई: राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने औरंगाबाद, नाशिक आणि मालेगाव शहरात अंशतः लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा, कॉलेज, क्लासेस, पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. नाशिक, औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती  दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार नाशिक, निफाड, मालेगाव, नांदगावमधील सर्व शाळा, महाविद्यालये इतर शिक्षण संस्था पूर्णतः बंद राहतील. 15 तारखेनंतर शहरात विवाहसमारंभांना परवानगी नसणार आहे. शहर  आणि जिल्ह्यातील दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहतील. बार आणि अन्य खाद्यपदार्थांचे हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. धार्मिक, राजकीय आणि सामाजिक समारंभांवर पूर्णतः बंदी असणार आहे.


जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास स्थानिक प्रशासनाकडून कडक  कारवाई करण्यात येईल. रविवारी नाशिक जिल्ह्यात 654 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर, तर सोमवारी 675 कोरोना पॉझिटिव्ह  आढळून आले. त्यामुळे नाशिकमधील प्रशासन सतर्क झाले आहे.


औरंगाबादमध्येही  अंशतः लॉकडाऊन 


औरंगाबादमध्येही कोरोना संसर्ग  वाढत असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक प्रशानसनाने अंशतः लॉकडाऊनचा निर्णय घेतला. औरंगाबादमध्ये 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत अंशतः लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊनदरम्यान, सार्वजनिक सभा, साप्ताहिक बाजार, खेळ स्पर्धा, शाळा,  कॉलेज, बंद राहतील. विवाह समारंभांनाही परवानगी असणार  नाही.


मुंबईतही मुख्यमंत्र्यांचे लॉकडाऊनचे संकेत 


मुंबईतही कोरोना संसर्गामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची रोजची संख्या हजाराच्या पार जात आहे. कोरोना संसर्गांची हीच गती राहिल्यास लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचे लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात येत आहे.