कृष्णात पाटील, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. डोंबिवलीनंतर आता पुण्यात एकूण ओमायक्रॉनचे तब्बल 7 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या ही एकूण 8 इतकी झाली आहे. आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. (corona new variant omicron 1 patient found in pune and 6 patient found in pimpari Chinchwad) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या 7 पैकी 6 जण हे पिंपरी चिंचवडमधील आहे. तर उर्वरित 1 जण पुण्यातील आहे. या 7 जणांना कोणतीही लक्षणं नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे या 7 जणांपैकी 3 जणांनी कोरोना लस घेतलेली नाही.  



मिळालेल्या माहितीनुसार सहापैकी 3 जण नायजेरियामधून आल्याची माहिती मिळाली आहे. तर इतर 3 जण त्यांच्या जवळचे असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी 13 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 45 वर्षांचा भाऊ, दीड वर्षे आणि 7 वर्षांच्या दोन मुलींना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे.


नायजेरीयावरून आलेल्या महिलेची लक्षणं अत्यंत सौम्य असून इतर 5 जणांना कोणतीही लक्षण नाही. मात्र त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 6 पैकी 3 जण 18  वर्षांखालील असल्याने त्यांनी लस घेतली नाही. तर उर्वरित 3 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते.


पिंपरी चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात 1 ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आल्याने आता चिंता वाढली आहे. त्यामुळे आता पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे. 


पहिला रुग्ण कुठे? 


दरम्यान राज्यातील कोरोनाच्या नव्या विषाणूचा पहिला रुग्ण हा 4 डिसेंबरला डोंबिवलीत आढळून आला. हा रुग्ण 33 वर्षीय असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या रुग्णानेही कोरोना लसीचा डोस घेतला नाही. या रुग्णाला प्रवासाचा इतिहास आहे. दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन आणि दिल्ली असा प्रवासाचा इतिहास होता.