कल्याण : गेल्या महिनाभरात कोरोनाने (Coronavirus) अक्षरशः धुमाकूळ घातल्याने चिंताग्रस्त झालेल्या कल्याण - डोंबिवलीकरांसाठी (Kalyan,Dombivali) एक दिलासादायक बातमी आहे. दररोज वेगवेगळे रेकॉर्ड प्रस्थापित करणारी कोविडची रुग्णसंख्या स्थिरावत चालल्याचे आशादायी चित्र दिसू लागले आहे. तसेच कोरोना 25 टक्क्यांवर पोहोचलेला पॉझिटिव्हीटी रेटही 11 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मार्च महिन्यापासून कल्याण डोंबिवलीतील क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येने वाढ होत होती.आधी 2 आकडी असणारी रुग्णसंख्या हळूहळू तीन आकडी आणि नंतर तीन आकड्यांवरून थेट चार आकडीपर्यंत ही रुग्णवाढ 1 हजारांहून अधिक पोहचली. एप्रिल महिन्यात तर या रुग्णसंख्येने आपले सर्व जुने रेकॉर्ड मोडून काढत थेट अडीच हजारांचा टप्पा गाठला. त्यामुळे साहजिकच कल्याण डोंबिवलीकरांसह महापालिका प्रशासनाने हतबलून गेले होते. कल्याण - डोंबिवलीतील ही कोविड रुग्णसंख्या 500 ते 700 च्या आसपास स्थिरावल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. 


एवढेच नव्हे तर थेट 25 टक्क्यांवर पोचलेला इथला पॉझिटिव्हीटी रेटही (कोविड टेस्ट केलेल्या व्यक्तींमध्ये कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती सापडण्याचे प्रमाण) 11 टक्क्यांपर्यंत खाली आल्याची माहिती साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली. तर या सर्वांचा परिणाम कोविड रुग्णसंख्या दुप्पट होण्याच्या कालावधीवरही झालेला दिसत आहे. 


महिन्याभरापूर्वी 52 दिवसांचा असणारा हा रुग्ण दुपट्टीचा कालावधी आता 67 दिवसांवर आल्याचे डॉ. पानपाटील म्हणाल्या. तर कल्याण - डोंबिवलीतील आताची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी केडीएमसी प्रशासनातर्फे विविध प्रयत्न सुरु आहेत. येत्या काळात ही रुग्णसंख्या नक्कीच आणखी कमी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.