बीड : आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे बीड जिल्ह्यातील पहिला रुग्ण सापडला आहे. आतापर्यंत एकूण १०० जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील ९९ नमुने प्राप्त झाले. त्यात आज एक जण पॉझिटिव्ह निघाला. तर अन्य एकाचा नमुने येणे बाकी आहे. पहिला रुग्ण सापडल्याने १० गावे अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही गावे क्वारंटाइन झाली आहेत.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपळा येथे सापडलेला हा रुग्ण नगर येथे राहत होता. राज्यात लॉकडाऊन झाल्यानंतर आणि जिल्ह्याच्या सीमा बंद झाल्यानंतर तो १ एप्रिलपर्यंत नगरमधील एका मशिदीतच राहात होता. दोन एप्रिल रोजी कुठल्यातरी आड मार्गाने तो आपल्या पिंपळा या गावी पोहोचला. त्याच्याच संपर्कात असलेल्या अन्य एकाचा नमुना देखील स्वॅब साठी घेण्यात आलेला आहे. त्याचा अहवाल येणे बाकी असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.


१० गावे अनिश्चित कालावधीसाठी बंद


आष्टी तालुक्यातील पिंपळा, सुम्बेवाडी, धनगर वाडी, ढोबळसांगवी,व खरडगव्हाण  ही गावे सील करण्यात आली आहेत. हा भाग क्वानटोमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच या गावच्या पुढील चार किमी परिसरातील लोणी, नांदूर, सोलापूरवाडी, खुंटफल, कोयाळ ही गावे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. आता ही गावे अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येत असून तिथे पूर्णवेळ संचारबंदी असणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत


आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे एक कोरोनाग्रस्त आढळला असून पिंपळा गावापासून सात किलोमीटर परिसरातील गावात आरोग्य सर्वेक्षण होत आहे. पहिल्या दिवशी २ हजार १०३ घरातील ९ हजार४७६ लोकांच्या तपासणी करण्यात आली आहे. यात सुदैवाने कोणालाही लक्षणे आढळून आली नाहीत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी  यांनी दिली.


दररोज होणार तपासणी    


कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात जवळून तिघे असल्याचे सुरुवातीस सांगण्यात आले. परंतु नंतर कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात सहा जण आल्याची माहिती समोर आली. या प्रकाराची जिल्हाधिकार्‍यांनी गांभीर्याने दखल घेत तातडीने आरोग्य सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. यात २४आरोग्य पथकामार्फत प्रत्येकी १००0 घरांची तपासणी करण्यात आली. पिंपळासह परिसरातील धनगरवाडी, काकडवाडी, खरड गव्हाण, सुमबेवाडी गावातील एकूण २ हजार १०३ घरांचा सर्वे करण्यात आला. त्यामध्ये एकूण ९४७६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. आता पुढील १४ दिवस दररोज या व्यक्तींची तपासणी होणार आहे.