कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा वार्डबॉयवर हल्ला
रुग्णाचा मृतदेह ताब्यात न दिल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी वार्डबॉय वर हल्ला केला आहे.
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. तर या धोकादायक व्हायरसमुळे आतापर्यंत ५९ हजार ४४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या कठीण प्रसंगा दरम्यान अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. अमरावतीमध्ये कोरोना बाधित रुग्णाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न दिल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी कोविड रुग्णालयात कार्यरत असलेल्या वार्डबॉय वरच हल्ला केला. शिवाय रुग्णालयाची देखील तोडफोड केली. ही घटना मंगळवारी रात्री घडली.
अमरावतीच्या सुपर स्पेशालिस्ट या कोवीड रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कुशल तायडे या वॉर्डबॉयच्या तक्रारीवरून नातेवाईकांवर गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला असून सध्या वॉर्डबॉय वर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अमरावतीच्या सुपर स्पेशालिस्ट या कोवीड रुग्णालयात काल रात्री दहा वाजताच्या सुमारास एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णाचे नातेवाईक रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात मागितला. परंतु मृतदेह ताब्यात देण्याचे अधिकार आम्हाला नसल्याने आम्ही मृतदेह देणार नसल्याचे वॉर्ड बॉय कुशल तायडे ने सांगितले.
त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी वार्डबायला जबर मारहाण केली हे नातेवाईक एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी यात रुग्णालयातील एका कार्यालयाची तोडफोडह केली. दरम्यान तर देशात एकूण ३२ लाख ३४ हजार ४७५ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ५९ हजार ४४९ रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.