आतिष भोईर, कल्याण : मुंबई, ठाण्यात करोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच त्याला लागून असणाऱ्या कल्याण डोंबिवलीतही कोरोना वेगाने पसरत आहे. दररोज 30 हून अधिक रुग्ण येथे वाढत आहेत. त्यामुळे नवीन रूग्णांमध्य़े मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या सहा दिवसात या क्षेत्रात 302 रूग्ण आढळून आले असून महिन्याभरातच 650 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. कल्याण डोंबिवलीतील कोरोनाच्या आकड्याने अवघ्या काही दिवसांतच आठशेचा आकडा पार केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कल्याण डोंबिवलीकरांमध्ये भितीचे वातावरण पसरलं आहे. महापालिका क्षेत्रात रूग्णांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पालिका प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र मुंबई, ठाण्यात नोकरीला जाणा-या कर्मचा-यांना कोरोनाची लागण होत असून त्यांच्या संपर्कातील लोकांनाही करोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच रूग्णांमध्ये लहान बालक आणि मुलांचंही प्रमाण वाढत आहे. 


कल्याण डोंबिवलीपाठोपाठ टिटवाळा आणि आंबिवली परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. कोरोनाचा एकीकडे आकडा 800 च्या वर गेला असला तरी अजूनही काही लोकं गंभीरपणे वागत नाहीयेत. लोकं मोठ्या संख्येने अद्याप बाहेर फिरताना दिसत आहेत. लॉकडाऊनला आता 2 महिने व्हायला आले तरी इथल्या कोरोनाची संख्या काहीही केल्या कमी होण्याचे नाव घेत नसल्याने येणारा काळ कल्याण डोंबिवलीसाठी अधिक आव्हानात्मक असणार हे नक्कीच,