मुंबई : जगभरामध्ये धुमाकूळ घातल्यानंतर कोरोनाने भारतातही एन्ट्री केली आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्वाधिक ४० रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे भारतातील सगळ्यात जास्त रुग्ण आहेत. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मास्कची मागणी मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे मास्कचा तुटवडाही जाणवतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मास्कचा पुरवठा व्हावा यासाठी राज्यातल्या सगळ्या मध्यवर्ती कारागृहांमध्ये कैद्यांद्वारे मास्क निर्मिती करण्यात येत आहे. ही मास्क कैदी स्वत: आणि तुरुंग प्रशासनही वापरत आहे. तसंच ही मास्क तुटवडा असल्यामुळे पुरवठादारांनाही देण्यात येत आहेत. कैद्यांना ही मास्क बनवल्याचा मोबदला मिळत आहे. हा मोबदला त्यांच्या नावावर जमा केला जात आहे. 



कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्याच्या दृष्टीने पुढचे १५ दिवस महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. गर्दी ओसरली नाही तर आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. कंपन्यांनी त्यांच्या अर्ध्या कर्मचाऱ्यांसोबतच काम करावं, तसंच शक्य असेल तिकडे कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम सुविधा देण्यात यावी, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. पुण्यामध्ये जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकानदारांनी ३ दिवस दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच पुण्यातली हॉटेल, रेस्टॉरंट्स, पब आणि बारही बंद करण्यात आले आहेत.